

सतीश चव्हाण यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा; विजयाचे शिल्पकार व्हा! आ .धनंजय मुंडे
आ. धनंजय मुंडे यांचे पदवीधर मतदारांना आवाहन; अंबाजोगाईत महायुतीचा भव्य मेळावा
नंदकिशोर मुंदडा म्हणाले, केज मतदारसंघातील महायुतीची ताकद सतीश चव्हाण यांच्या पाठीशी; आ. नमिता मुंदडा यांना चौथ्या विजयाचा विश्वास
अंबाजोगाई, दि. २१ (प्रतिनिधी) : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विक्रमी मताधिक्याने विजयी करा आणि त्यांच्या विजयाचे शिल्पकार व्हा, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी केले. सतीश चव्हाण यांना पदवीधर, शिक्षक आणि प्राध्यापकांच्या प्रश्नांची सखोल जाण असून विधान परिषदेतील त्यांच्या अनुभवाचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अंबाजोगाई येथे महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ पदवीधर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नेते तथा नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली आणि आ. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी केज विधानसभा मतदारसंघातील महायुतीची संपूर्ण ताकद सतीश चव्हाण यांच्या पाठीशी असल्याचे नंदकिशोर मुंदडा यांनी सांगितले, तर सतीशभाऊ चव्हाण चौथ्यांदा विधान परिषदेत जाणार असल्याचा विश्वास आ. नमिता मुंदडा यांनी व्यक्त केला.
पदवीधरांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची चव्हाण यांची हातोटी!
मेळाव्यात बोलताना आ. धनंजय मुंडे म्हणाले की, विधान परिषदेत सतीशभाऊ चव्हाण आणि आ. विक्रम काळे हे आमच्या टीमचे ‘ओपनिंग बॅट्समन’ आहेत. कमीत कमी शब्दांत महत्त्वाचे मुद्दे मांडून प्रश्नांची सोडवणूक करण्याची त्यांची हातोटी आहे. पदवीधर, शिक्षक आणि प्राध्यापकांच्या समस्या विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्याचा अनुभव सतीश चव्हाण यांच्याकडे आहे. त्यामुळे सुशिक्षित पदवीधर मतदार पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास व्यक्त करतील आणि पहिल्या पसंतीचे मत देऊन त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.
केज मतदारसंघातील महायुतीची ताकद चव्हाण यांच्या पाठीशी!
ज्येष्ठ नेते तथा नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा म्हणाले की, सतीश चव्हाण हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्षासह केज विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण महायुती त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. सतीश चव्हाण यांनी अनेक वर्षांपासून पदवीधरांचे प्रश्न सातत्याने मांडले आहेत. त्यांचा अनुभव आणि कार्यपद्धती लक्षात घेता, या निवडणुकीत त्यांना चांगले यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सतीशभाऊ चौथ्यांदा विधान परिषदेत जाणार!
आ. नमिता मुंदडा यांनी सतीश चव्हाण यांच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, सतीश चव्हाण यांना पदवीधरांच्या प्रश्नांचा दीर्घ अनुभव आहे. आगामी काळातही पदवीधर आणि शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे महायुतीची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी असून सतीशभाऊ चव्हाण सलग चौथ्यांदा विधान परिषदेत निवडून जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अपप्रचाराला बळी पडू नका; पहिल्या पसंतीचे मत द्या!
आ. विक्रम काळे यांनीही मेळाव्यात उपस्थितांशी संवाद साधला. कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता पदवीधर मतदारांनी सतीश चव्हाण यांना आपले आशीर्वाद द्यावेत आणि पहिल्या पसंतीचे मत देऊन त्यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
महायुतीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या मेळाव्याला माजी आमदार संजय दौंड, भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी, राजकिशोर मोदी, मकरंद पत्की, दत्ता पाटील, राजपाल लोमटे, रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र निकाळजे, बबनराव लोमटे, शिवसेनेचे ऋषिकेश लोमटे, राजाभाऊ औताडे, शिवाजी शिरसाट, बाळासाहेब शेप, भगवान केदार, नाना भगत, गोकुळ कदम, जयसिंग चव्हाण, कमलाकर कोपले, हिंदुलाल काकडे, दिनेश भराडीया, अजित देशमुख, विलास सोनवणे, शिवाजीराव घोगरे, बिभीषण फड, विजयकुमार नागरगोजे, सय्यद ताहेर, लक्ष्मण कर्नाल, रणजित लोमटे, तान्हाजी देशमुख, संजीवनी देशमुख आणि गणेश देशमुख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंबाजोगाईतील या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीच्या नेत्यांनी सतीश चव्हाण यांच्या प्रचाराला बळ देत पदवीधर मतदारांपर्यंत एकजुटीचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला. या मेळाव्यामुळे परळी, अंबाजोगाई आणि केज परिसरातील निवडणूक प्रचाराला अधिक वेग मिळाल्याचे चित्र दिसून आले.





