
डॉ. प्रतापसिंह पाटील यांना कैलास पाटील आणि डॉ. जे. के. जाधव यांचा जाहीर पाठिंबा
पदवीधरांच्या हक्कांची लढाई अधिक बळकट; महाविकास आघाडीच्या विजयासाठी एकजुटीचा निर्धार
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना गंगापूरचे माजी आमदार कैलास पाटील आणि लोकविकास बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जे. के. जाधव यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्यामुळे पदवीधर मतदारसंघातील निवडणूक प्रचाराला बळ मिळणार असल्याचा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील पदवीधरांचे प्रश्न, शिक्षण, रोजगार आणि युवकांच्या भवितव्याशी संबंधित मुद्द्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असल्याचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी सांगितले. कैलास पाटील आणि डॉ. जे. के. जाधव यांनी दिलेला जाहीर पाठिंबा हा आपल्यासाठी मोलाचा असून, त्यांच्या विश्वासाबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार
पदवीधरांच्या हक्कांचे संरक्षण, सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या, रोजगाराच्या संधी, शिक्षण क्षेत्रातील प्रश्न आणि युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजुटीने काम करण्याची गरज डॉ. पाटील यांनी अधोरेखित केली. विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि संघटनांचे मिळणारे समर्थन ही पदवीधरांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी प्रेरणा देणारी बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कैलास पाटील आणि डॉ. जे. के. जाधव यांच्या जाहीर पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, पदवीधर बांधवांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी दिली.
डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या वतीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत पदवीधरांचे प्रश्न आणि त्यांच्या अपेक्षा केंद्रस्थानी ठेवून प्रचाराला दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.





